मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतोय; अभिजीत दीपके यांची उपरोधिक पोस्ट, बालाघाट घटनेवरून भाजप सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी रविवारी मध्य प्रदेश सरकारवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी स्वतःला राज्याचे मुख्यमंत्री दर्शवणारे एक उपरोधात्मक राजीनामा पत्र सोशल मीडियावर शेअर केले. बालाघाट येथे संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी मुलांच्या पालकांची भेट घेण्यासाठी गेले असताना दीपके यांना काही इन्फ्लुएन्सर्सकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे पत्र एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा तातडीने राजीनामा देत आहे. मध्य प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. या संधीचा सोनेरी वापर करण्यात आणि जनतेची सेवा करण्यात मी पूर्णपणे अपयशी ठरलो आहे, असे पत्र दीपके यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे. या उपरोधिक पत्रात दीपके यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली.

सागर जिल्ह्यातील बनावट दारूकांड आणि बालाघाटमधील मुलांचे मृत्यू यांसारख्या विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. यावर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी मजेशीर टिप्पणी केली. दीपके हे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

शनिवारी अभिजित दीपके यांनी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अदोरी, कोरका आणि बोंडारी या गावांना भेट दिली. संसर्गजन्य आजारांमुळे प्राण गमावलेल्या आदिवासी मुलांच्या कुटुंबांचे सांत्वन करणे आणि स्थानिक आरोग्य सुविधांची माहिती घेणे हा या भेटीचा उद्देश होता. मात्र या दरम्यान इन्फ्लुएन्सरने त्यांना रोखले आणि तुम्ही इथे मृतदेहांचे राजकारण करायला आलात का? असा सवाल केला. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एवढ्या दुर्गम भागात या दीपके यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इन्फ्लुएन्सरला कुणी जाणीवपूर्वक पाठवले होते का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.