
नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाच्या कमाईसोबतच त्याच्या कथित ₹100 कोटींच्या OTT डीलचीही जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्या रागिणी सोना यांनी या बातम्यांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. निर्मात्या रागिणी सोना यांनी ₹100 कोटींच्या OTT कराराच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. सध्या टीमचे संपूर्ण लक्ष चित्रपटाच्या थिएट्रिकल रनवर असून, OTT रिलीजबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
NDTVशी बोलताना रागिणी सोना म्हणाल्या की, ₹100 कोटींच्या OTT ऑफरबाबत कोणतीही अधिकृत डील झालेली नाही. प्रेक्षकांनी अशा चर्चांकडे लक्ष न देता चित्रपटगृहात जाऊन ‘हनुमान अंश’ पाहावा, त्याचे कौतुक करावे आणि चित्रपटावर प्रेम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात अधिक बोलताना रागिणी सोना यांनी पुढे सांगितले की, भविष्यात अनेक OTT ऑफर्स येऊ शकतात; मात्र सध्या त्यांच्या टीमकडे अशा प्रकारची कोणतीही ऑफर आलेली नाही. OTTवर चित्रपट कधी प्रदर्शित करायचा, याबाबत टीममध्ये चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल आणि त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
विशेष म्हणजे, ‘हनुमान अंश’ OTTवर नेमका कधी येणार, याची माहिती स्वतः टीमलाही अद्याप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ₹१०० कोटींच्या OTT कराराच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी यांनी यापूर्वी सांगितले होते की, नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित कथा घेऊन त्यांनी एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला होता. मात्र, प्लॅटफॉर्मकडून हा प्रकल्प नाकारण्यात आला. चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपट नाकारला गेल्याचे त्यांना विशेष वाईट वाटले नाही. मात्र हिंदुस्थानची आध्यात्मिक आणि संतपरंपरा ज्या दृष्टिकोनातून पाहिली जात होती, त्यावर त्यांना आक्षेप होता. याच अनुभवामुळे नीम करोली बाबा यांची कथा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार अधिक दृढ झाला.























































