मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे भीषण अपघात; पोलादपूरच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या आनंदा वातावरणात कोकणाकडे प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक रविवारी सकाळी सुमारे 6.40 वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याच्या मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सतीश निवृत्ती पाटे (वय 29, रा. पोलादपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, अक्षता अरविंद कवडे (वय 28, रा. चिपळूण) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या आनंदासाठी सतीश पाटे आणि अक्षता कवडे हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होते. चिपळूणकडे येत असताना खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर आल्यानंतर अचानक दुचाकीवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्यामुळे ही दुचाकी महामार्गालगत असलेल्या तब्बल 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात जावून कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीस्वार सतीश पाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षता कवडे या गंभीर जखमी झाल्या.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरात ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यात आले. जगद्गुरु रामानंदचार्य श्री नरेंद्र्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांच्या वतीने भरणे नाका ब्रिजखाली अपघातासाठी 24तास कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेच्या आणि मदतकार्याच्या साहाय्याने गंभीर जखमी अक्षता कवडे यांच्यासह मृत सतीश पाटे यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सतीश पाटे यांना मृत घोषित केले. तर दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्या अक्षता कवडे यांच्यावर सध्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवास सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात चिपळूणच्या दिशेने निघालेला हा प्रवास अखेर दुर्दैवी ठरल्याने तसेच तरुण वयातच सतीश पाटे यांचा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण पोलादपूर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.