खड्डय़ांमुळे पोहोचण्यास विलंब, यूपीएससीचे साठ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नाशिक शहरामधील खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त असतानाच आता विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. रविवारी याच खड्डय़ांमुळे पोहोचण्यास विलंब झाल्याने सुमारे 60 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. यूपीएससी पेपर देता न आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

संघ लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) आज नाशिक शहरातील एकूण 13 उपकेंद्रांवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल प्रबोधिनी परीक्षा-द्वितीय 2026 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-द्वितीय 2026 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 4 हजार 375 परीक्षार्थी समाविष्ट होणार होते. डोंगरे वसतिगृह मैदानाजवळील व्ही. एन. नाईक महाविद्यालय येथेही एक उपकेंद्र होते. सकाळी दहा वाजता होणाऱया परीक्षेसाठी साडेनऊ वाजता पोहोचणे आवश्यक होते. मात्र, या महाविद्यालयासमोरील मुख्य रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना वळसा घालून केंद्रावर पोहोचावे लागले. शहरातील खड्डय़ांमुळे आधीच वाहतूक मंदावलेली आहे. वेळेचा अपव्यय होऊन परीक्षार्थी दोन मिनिटे उशिरा केंद्रावर पोचले. यात चांदवड, कळवण, नाशिकसह अन्य जिह्यांतून आलेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

पालकांची नाराजी

अवघ्या दोन मिनिटांच्या विलंबाने परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त झाले. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पालकांची समजूत काढली.