
पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात राजकीय हालचाली वाढल्या असून आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने नवी आघाडी स्थापन केली आहे. ‘गोवा फर्स्ट’ नावाने ही आघाडी आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे.
‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज ही घोषणा केली. भाजपचा पराभव करू इच्छिणाऱया आणि काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेसाठी ‘गोवा फर्स्ट’ हा सशक्त पर्याय असेल. ही आघाडी निवडणूक जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये गोव्यात निवडणूक होणार आहे. गोव्यात सध्या भाजपचे सरकार आहे.
राज्यसभेची उमेदवारी देताना सावधगिरी बाळगणार
राज्यसभेसाठी उमेदवार निवडताना यापुढे जास्त काळजी घेतली जाईल, असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. तब्बल सात राज्यसभा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याबद्दल विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली.


























































