
गणेशोत्सव जवळ आला की घराघरांत मोदकाच्या तयारीला सुरुवात होते. उकडीचे मोदक मऊ, लुसलुशीत आणि चिरा न पडता तयार व्हावेत यासाठी सारणाइतकीच तांदळाच्या पिठाची गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे मोदकासाठी तांदूळ निवडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मोदकाच्या पिठासाठी जुना इंद्रायणी तांदूळ वापरता येतो. इंद्रायणीच्या पिठापासून तयार झालेले मोदक काहीसे चिकटसर होण्याची शक्यता असते. दुसरीकडे आंबेमोहर तांदूळ मऊ आणि लुसलुशीत मोदकांसाठी चांगला पर्याय मानला जातो. या तांदळापासून तयार केलेल्या मोदकांना चिरा पडण्याचे प्रमाणही कमी राहू शकते.
सुवासिक मोदकांसाठी बासमती तांदळाचा वापर केला जातो. मात्र बासमतीच्या पिठापासून तयार होणारे मोदक काहीसे कोरडे होण्याची तसेच तडे जाण्याची शक्यता असते. नवीन तांदूळ किंवा कोलम तांदूळ मोदकासाठी वापरणे टाळणे योग्य ठरते.
घरच्या घरी पीठ तयार करायचे असल्यास निवडलेला तांदूळ स्वच्छ धुऊन १५ ते २० मिनिटे निथळत ठेवावा. त्यानंतर स्वच्छ सुती कपड्यावर तांदूळ पसरवून पंख्याच्या हवेत पूर्णपणे सुकवावा. उन्हात कडकडीत सुकवल्यास तांदूळ अधिक कोरडा होऊन मोदकांना चिरा पडण्याची शक्यता वाढू शकते. तांदूळ व्यवस्थित सुकल्यानंतर तो दळून त्याचे बारीक पीठ तयार करावे.























































