
रशिया-युव्रेन आणि नंतर इराण-अमेरिका युद्धामुळे पोळलेल्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिलासा दिला. नोव्हेंबरमध्ये होणाऱया अमेरिकेतील निवडणुकांनंतर इराण युद्ध थांबण्याचे संकेत देतानाच त्यानंतर पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल, असा दावाही त्यांनी केला.
डब्लिन येथे ते मीडियाशी बोलत होते. होर्मुझ सामुद्रधुनीवरील वर्चस्वाच्या मुद्दय़ावरून अमेरिका व इराणमध्ये संघर्ष अजूनही धुमसत आहे. हा संघर्ष कधी संपणार असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी नोव्हेंबरची डेडलाइन सांगितली. ‘निवडणुकीनंतर संपूर्ण वातावरण निवळेल. निवडणुकांमध्ये अडथळा यावा म्हणून इराण युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे सगळे फार काळ चालेल असे वाटत नाही. त्यानंतर तेलाच्या किमतीही कोसळतील, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेने पोलीसगिरी करू नये – इराण
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला युद्ध नकोच होते आणि ते सुरू ठेवण्याचीही आमची इच्छा नाही. आमचे प्राधान्य शांततेलाच आहे. अमेरिकेने पश्चिम आशियात पोलीसगिरी करू नये इतकेच आमचे म्हणणे आहे. पश्चिम आशियात जे देश आहेत, त्यांनीच येथील सुरक्षेची आणि अखंडतेची चिंता वाहायला हवी, असे पेजेश्कियान यांनी ब्रिक्स परिषदेत बोलताना स्पष्ट केले.























































