पर्यावरणविरोधी प्रत्येक गोष्ट भाजपला विकास वाटतो, आदित्य ठाकरे यांची टीका; वर्सोव्याचा नाना-नानी पार्क, लोखंडवाला तलावाची केली प्रत्यक्ष पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्सोवा-दहिसर लिंक रोडसाठी 30 वर्षांपूर्वी उभारलेल्या निसर्गसंपन्न नाना-नानी पार्क वाचवण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज नाना-नानी पार्क येथे भेट देऊन पालिकेच्या प्रस्तावित वृक्षतोडीची पाहणी केली. नाना-नानी पार्क वाचवण्यासाठी आपण स्थानिकांसोबत असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ असा नारा घुमला. भाजप सरकार निसर्गविरोधी आहे. मुंबईत मोकळी जागा ठेवायचीच नाही. निसर्गाच्या विरोधातील कोणतीही गोष्ट भाजपला विकास वाटतो, असा हल्ला त्यांनी चढवला.

स्थानिक नागरिकांनी कचऱयाचा ढीग साफ करून नाना-नानी पार्क उभारले आहे. त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता ओम पुरी यांच्या उपस्थितीत नाना-नानी पार्क सुरू झाले. मात्र विकासाच्या नावाखाली सत्ताधारी भाजप आणि पालिका नाना-नानी पार्क हटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत मोकळी जागा ठेवायचीच नाही हे भाजप राजवटीने ठरविले आहे, असा घणाघात त्यांनी केला. मात्र भाजपच्या या निसर्गविरोधी भूमिकेविरोधात आपण जोरदार लढा सुरूच ठेवू, अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी आमदार सुनील शिंदे, हारून खान, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

पाणथळ जागांचे नुकसान
पालिकेच्या प्रस्तावित कोस्टल रोड कनेक्टरमुळे पाणथळ जागांचे होत असलेल्या नुकसानीबाबत त्यांनी आज अंधेरीच्या लोखंडवाला तलावाचीही पाहणी केली. पालिका प्रशासनाकडून यावेळी प्रस्तावित प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे यांना सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पात खारफुटी आणि तलावाचे नुकसान टाळण्यासाठी पिलर्सची जागा बदलावी, गर्डर्समधील अंतर वाढवावे अशा सूचना त्यांनी केल्या.