
राज्यातील सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करून तातडीने चौकशी करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या परीक्षा केंद्रांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाणार आहे.
सीईटीमधील पर्सेंटाइलबाबतच्या तक्रारी तसेच डेटा लीक प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने फडणवीस यांची आज भेट घेत परीक्षा ऑनलाइन घेण्याऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी केली.
शिष्टमंडळाचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच सीईटी गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱयांची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.


























































