
चॉकलेटचे नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाच्या आवडत्या मोदकाला चॉकलेटची चव दिली तर घरातील बच्चेकंपनीही खूश होणार. पारंपरिक मोदकांपेक्षा वेगळा आणि झटपट तयार होणारा चॉकलेट मोदक हा यंदाच्या गणेशोत्सवासाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.
चॉकलेट मोदकासाठी चॉकलेट चिप्स किंवा बेकिंग चॉकलेट, खवा किंवा मावा, मिल्कमेड, दूध, कोको, कॉर्नफ्लोअर, तूप आणि वेलची यांसारख्या साहित्याचा वापर करता येतो.
मोदक तयार करण्यासाठी पॅनमध्ये तूप, मिल्कमेड आणि दूध घेऊन मंद आचेवर गरम करावे. त्यानंतर कोको आणि कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि ती पॅनमधील मिश्रणात घालावी. मिश्रण सतत ढवळत राहावे. ते पॅनच्या कडांपासून सुटू लागले की गॅस बंद करावा.
मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर त्याचे मोदक तयार करावेत. तयार झालेले मोदक खोलीच्या तपमानावर काही काळ ठेवता येतात. ते लवकर सेट करायचे असल्यास काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतात.
पारंपरिक उकडीच्या मोदकांसोबत चॉकलेट मोदकांचा नैवेद्य केल्यास गणेशोत्सवाच्या मेजवानीत वेगळेपणा आणता येईल.

























































