प्रश्न विचारण्याच्या लोकशाही स्वातंत्र्याशिवाय विकसित हिंदुस्थान शक्य नाही, अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “प्रश्न विचारण्याचे लोकशाही स्वातंत्र्य असल्याशिवाय विकसित हिंदुस्थान हे स्वप्न कधीही साकार होऊ शकत नाही,” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. एका बाजूला देश जागतिक स्तरावर मोठे कार्यक्रम आयोजित करत असताना, देशांतर्गत पातळीवर मात्र लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अखिलेश यादव यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, लोकशाहीत नागरिकांना, पत्रकारांना आणि विरोधकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा तसेच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र सध्या देशात आणि विशेषतः उत्तर प्रदेशात प्रश्न विचारणाऱ्यांचा आणि सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जोवर नागरिकांना निर्भयपणे आपले मत मांडण्याचे आणि सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, तोवर केवळ विकासाच्या आणि विकसित हिंदुस्थानच्या पोकळ गप्पा मारून कोणताही खरा विकास साध्य होणार नाही, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच विरोधकांना लक्ष्य करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत यादव यांनी सरकारला जागतिक मंचावर केवळ दिखावा करण्याऐवजी देशांतर्गत लोकशाही अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला आहे.