
‘प्रीतम अॅण्ड पेद्रो’ ही सायबर क्राईम सिरीयल पाहून ऑनलाईन फसवणूक करणाऱया हरयाणाच्या एका तरुणाला मुंबईच्या मालाड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आलोक मदनमोहन केशरी (24, राहणार – गुरुग्राम, हरयाणा) या तरुणाने मालाड (पश्चिम) चिंचोली व्हिलेज येथे राहणाऱया तीर्थ अश्विन लिमणी (21) या तरुणाची 24 लाख 64 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघड झाल्यावर बांगूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पवार व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक विराज जगदाळे, उपनिरीक्षक मंगेश किरपेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली हरयाणा येथे सापळा रचून आलोक केशरी यास अटक केली.
मालाड येथे राहणारा तीर्थ लिमणी हा तरुण ऑनलाईन एमबीएचे शिक्षण घेत असताना हरयाणाच्या आलोक केशरीने आपण स्टुडंट कॉन्सिलर असल्याचे भासवून तीर्थ लिमणीशी संपर्क साधला. तू कॉपी करतोस असा त्याच्यावर ठपका ठेवला. प्रकरण मिटवायचे असेल तर मी मागेल तितके पैसे तुला द्यावे लागतील नाहीतर तुझे नाव ब्लॅक लिस्टमध्ये येईल. कुठल्याही कॉलेजमध्ये तुला प्रवेश मिळणार नाही असे धमकावले. घाबरलेल्या तीर्थने गेल्या 2 महिन्यांत आलोकच्या खात्यात 24 लाख 64 हजार रुपये जमा केले. हे तीर्थच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
‘प्रीतम अॅण्ड पेद्रो’ या ओटीटीवरील सिरीयलमधील खलनायकाचे सायबर गुन्हे पाहून मुंबईच्या तीर्थ लिमणीची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली हरयाणाच्या आलोक केशरीने मालाड पोलिसांना दिली तेव्हा सर्वच आवाक झाले. या कारवाईत सायबर अधिकारी मंगेश किरपेकर, हवालदार गोसावी, आचार्य, पांजरी, मगर, शिंदे आदी पोलीस पथकाने भाग घेतला.

























































