
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांसाठीच मोठ्या आनंदाचा उत्सव. मात्र, ज्यांच्या नावातच गणेश आहे अशा गणेश भेळने यंदा अतिशय अनोखा गणेशोत्सव साजरा करण्याचे योजले आहे. २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांचा वापर करून १३ फूट उंच आणि १० फूट रुंद असा आगळावेगळा गणपती साकारला आहे. नामदार गोखले पथ म्हणजेच फर्ग्युसन रस्त्यावरील गणेश भेळच्या दालनाबाहेर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी छाया गुडमेवार, संचालक रुपेश गुडमेवार आणि दिनेश गुडमेवार व अनुष्का गुडमेवार उपस्थित होते.
मूर्तीवरील या पुऱ्या १२ दिवस आहेत तशाच राहाव्यात, यासाठी काही विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशाप्रकारे अनोख्या रितीने गणपती साकारण्याचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन गणेश भेळ ग्राहकांसमोर येत असते. ही मूर्ती तयार करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू असून, या सर्व पुऱ्या आपल्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. तर कलाकार प्रशांत साळुंखे यांनी ही मूर्ती प्रत्यक्षात साकारली आहे. पुढील १२ दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणपती गणेशभक्तांना पाहता येणार आहे. शिवमुद्रा ढोलताशा पथकाने यावेळी अतिशय उत्तम असे वादन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
























































