
देशात अवैध धंदे थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना केंद्र सरकार करत आहे. यादरम्यान ऑगस्टमध्ये गुजरातमध्ये नऊजणांचा मृत्यू अवैध दारू सेवनाने झाला होता. त्यानंतर मध्य प्रदेशात आठ दिवसांपूर्वी १३ जणांचा बळी दारूने घेतला. यानंतर आता नागालॅण्डमध्ये नऊजणांनी विषारी दारू पिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृताचे आकडे वाढत असताना अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे. नागालॅण्डमध्ये विषारी दारूकांडानंतर पोलिसांच्या छाप्यात ४७० बाटल्या आणि बिअरचे कॅन जप्त करण्यात आले.
नागालॅण्डमधील तुएनसांग जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने नऊजणांचा बळी गेला असून, यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दारू प्यायल्यानंतर काही लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनांची माहिती मिळाल्यानंतर तुएनसांग पोलिसांनी व्यापक शोधमोहीम आणि छापेमारी अभियान राबविले. यादरम्यान अनेक ठिकाणांहून दारूचे पाऊच, ४७० बाटल्या आणि बिअरचे कॅन जप्त करण्यात आले.
तुएनसांग शहर आणि चेंदांग सॅडल गावात १० आणि ११ सप्टेंबर रोजी मृत्यूच्या घटना समोर आल्या. तुएनसांग सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या मृत्यूचा नमुना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या घटनेनंतर दारू विकणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
तपासात समोर आले की, मृतांपैकी बहुतेकांनी तब्येत बिघडण्यापूर्वी दारू प्यायली होती. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर राज्य पोलिसांनी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच जनतेला अज्ञात किंवा अनधिकृत स्त्रोतांकडून मिळालेली दारू न पिण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद दारू कुठून आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. कारण, नागालॅण्डमध्ये दारूबंदी आहे.
























































