
बालासोरमधील घनदाट जंगलात पाच अत्यंत दुर्मिळ ओरांगुटान अत्यंत दयनीय अवस्थेत सापडल्याची घटना अलीकडेच घडली आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांनी जंगलात सोडून दिलेल्या ओरांगुटान बालासोरमधील प्रतिक इंदलकर या मराठमोळ्या विभागीय वन अधिकाऱ्यासह त्यांच्या टीमने या दुर्मिळ माकडांच्या पिलांना जीवदान दिले आहे. वन्यप्राण्यांच्या या आंतरराष्ट्रीय तस्करीची थेट पंतप्रधान कार्यालयापासून (पीएमओ) केंद्रीय गृह मंत्रालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
बालासोरमधील हे जंगल ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सीमेवर आहे. मागील आठवड्यात पहाटेच्या वेळेस ही पाच माकडे अत्यंत भयभीत अवस्थेत जंगलातील सुरुच्या वनात आढळून आली. स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे पाच ओरांगुटान दिसताच त्यांनी विभागीय वन अधिकारी प्रतिक इंदलकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. मूळ देशातून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मलेशिया-इंडोनेशियातील उष्णकटिबंधीय जंगलात (ट्रॉपिकल फॉरेस्ट) सापडणारे ओरांगुटान ओडिशातील जंगलात सापडल्यामुळे वन विभाग सतर्क झाला. उष्णकटिबंध प्रदेशातील ही माकडे एकदम वेगळ्या प्रदेशात येऊन पडल्याने भेदरलेली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्वरित केळी, फळे, ज्यूस, आवश्यक औषधे दिली आणि त्वरित भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणी संग्रहालयात नेण्याचा निर्णय घेतला. वन अधिकारी प्रतिक इंदलकर, रेंजऑफिसर शिशिर बेहरा, फॉरेस्टर संजय महंती व त्यांच्या टीमने सुरुवातीलाच काळजी घेतल्याने या पिलांचा जीव वाचला. अन्यथा ही पिले जंगली श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडली असती.
बोलासोरमधील बिचित्रपूरच्या जंगलात सापडलेल्या ओरांगुटान यांना तीनशे कि.मी. वर असलेल्या भुवनेश्वरच्या नंदनकानन प्राणी संग्रहालयात सुरक्षितपणे नेण्यात आले.
एटीएसमार्फत तस्करीचा तपास
ओरांगुटान तस्करीमागे आंतराष्ट्रीय रॅकेट असल्याचा प्राथमिक संशय आहे. ओडिशा सरकारने एटीएसमार्फत चौकशी सुरू केली आहे.
इंदलकरांना सरकारी सेवेचा वारसा
मुंबईत शिक्षण पूर्ण करून प्रतिक इंदलकर यांनी यूपीएससी परीक्षा दिली. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) मध्ये देशपातळीवर आठवा रैंक मिळवला. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक इंदलकर यांचा सत्कार केला होता. त्यांचे वडील प्रकाश इंदलकर हे राज्य सरकारी सेवेतून उपसचिव म्हणून निवृत्त झाले. मुख्य सचिवांचे ओएसडी म्हणून त्यांनी काम केले आहे. आता प्रकाश इंदलकर हे आरटीआय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.


























































