
हिंदुस्थानी तिरंदाज धीरज बोम्मादेवरा याने आपल्या अचूक बाणांनी इतिहासाचा ‘वेध’ घेतला. तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलच्या पुरुष रिकव्र्व्ह वैयक्तिक स्पर्धेत जपानच्या जुन्या नाकानिशीला शूट-ऑफमध्ये १०-९ असे नमवून धीरजने सुवर्णपदकावर नाव कोरले. विश्वचषक फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच पुरुष रिकर्व्ह तिरंदाज ठरला.
धीरज आणि नाकानिशी यांच्यातील अंतिम सामना अक्षरशः श्वास रोखून धरणारा ठरला. पाच सेट्सनंतर दोघेही ५-५ अशा बरोबरीत होते. निर्णायक शूट-ऑ फमध्ये धोरजने संयम आणि अचूकतेचा जबरदस्त नमुना पेश करीत १०-९ असा विजय मिळविला. त्याने २८-२८, २८-२९, २९-२८, २८-३०, २८-२७ अशी कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आणि अखेर सुवर्णावर कब्जा केला.
१६ वर्षांचा ‘दुष्काळ’ संपला !
धीरजच्या या ‘सुवर्णवेधा’ ने हिंदुस्थानी पुरुष रिकर्व्ह तिरंदाजीचा तब्बल १६ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला. २०१० मध्ये एडिनबर्ग येथे जयंत तालुकदारने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर पुरुष रिकव्र्व्हमध्ये हिंदुस्थानला वर्ल्ड कप फायनलमध्ये सुवर्णांची प्रतीक्षा होती. धीरजने ती प्रतीक्षा संपवून नवा इतिहास लिहिला. विशेष म्हणजे, २०२३ आणि २०२४च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धीरजला अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, यंदा त्याने अपयशाची राख झटकत थेट सुवर्णपदकावर ‘निशाणा’ साधला. २५ वर्षीय धीरज सध्या जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असून, हिंदुस्थानी लष्करात कार्यरत आहे.
आईचे मंगळसूत्र तारण ठेवले; मुलाने देशासाठी सुवर्ण जिंकले !
धीरजच्या या यशामागची संघर्षकथा अंगावर शहारे आणणारी आहे. २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासाठी आणि महागडी उपकरणे खरेदी करण्यासाठी कुटुंबासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या. परिस्थिती इतकी बिकट होती की, धीरजने तिरंदाजी सोडण्याचा विचार केला होता. मात्र, आई रेवती यांनी मुलाचे स्वप्न मोडू दिले नाही. मुलाच्या धनुष्यासाठी त्यांनी स्वतःचे मंगळसूत्र तारण ठेवून कर्ज घेतले. वडील श्रवण कुमार यांनीही मुलाच्या कारकिर्दीसाठी स्वतः तिरंदाजीचे पंच म्हणून काम सुरू केले. आंध्र प्रदेशातील वरिष्ठ तिरंदाजी पंचांमध्ये त्यांचा समावेश आहे. आईच्या त्यागातून मिळालेला धनुष्यबाण अखेर जगाच्या व्यासपीठावर गरजला आणि त्यातून हिंदुस्थानसाठी सुवर्णइतिहास लिहिला गेला.




























































