
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांवर एका 35 वर्षीय महिलेचे खासगी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सॲपवर हे आक्षेपार्ह साहित्य पसरवून महिलेच्या गोपनीयतेचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा भंग केल्याचा गंभीर आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आपल्या तक्रारीत तिने नमूद केले आहे की, आरोपींनी तिचे खासगी व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सॲप ग्रुप्सवर पसरवले. यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर, प्रतिष्ठेवर आणि सामाजिक सन्मानावर प्रचंड आघात झाला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मंगळवारी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी भाजप जिल्हा सचिव आलोक सिंह, त्याचे दोन सहकारी गणेश गुप्ता आणि अजित मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) कायद्याच्या कलम 67 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचा समावेश होतो. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बांसडीह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश सिंग यांनी सांगितले.
दुसरीकडे, भाजपचे जिल्हा मीडिया प्रभारी पंकज सिंग यांनी माध्यमांशी बोलताना आलोक सिंग हे पक्षाचे जिल्हा सचिव असल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
























































