
>> सचिन कावडे
मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यास उजाळा देण्यासाठी ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम : हिंगोली जिल्हयाचे योगदान’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकासाठी १.१२ लाख रुपये खर्च झाले. अडीच वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य असलेले संजय टाकळगव्हाणकर हे खर्चाची रक्कम मिळावी म्हणून प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र जिल्हा प्रशासनाने हा खर्च चक्क बुडवला आहे.
२०२३ मध्ये राज्य सरकारने मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा केला. यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि त्यांच्या बलिदानाची माहिती शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसह येणाऱ्या पिढीला व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शासनाकडून हिंगोली जिल्ह्याला ६ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला होता. हिंगोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी स्वातंत्र्यसैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर यांचे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम हिंगोली जिल्ह्याचे योगदान’ या पुस्तकाची निवड करण्याचे आदेश तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी दिले होते. सोनटक्के यांनी संजय टाकळगव्हाणकर यांना त्या पुस्तकाच्या ४०० प्रती छापण्यास सांगितले. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या कार्यक्रमात या पुस्तकाच्या ५० प्रती जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. उर्वरित ३५० पुस्तके सोनटक्के यांच्याकडे वाटपासाठी देण्यात आली.
पुस्तकाचा खर्च मागताच कानावर हात
संजय टाकळगव्हाणकर यांनी पुस्तक छपाईसाठी झालेल्या १.१२ लाख रुपये खर्चाचे बिल सादर केले. यासाठी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. मात्र शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी पुस्तक छपाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे खर्चाची मागणीच केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर टाकळगव्हाणकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे दाद मागितली. पापळकर यांनी तात्काळ खर्चाची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. प्रत्येक जिल्हयाला सहा लाख रुपये देण्यात आले होते. या निधीतील फक्त ४८ हजार समितीकडे शिल्लक आहेत. त्यामुळे टाकळगव्हाणकर यांना ४८ हजार रुपयांचेच बिल सादर करण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यावर अधिकाऱ्यांनी ही रक्क म तांत्रिक अडचणीमुळे शासनाकडे परत गेल्याचे सांगून हात वर केले. त्यानंतर आलेले जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि सध्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडेही टाकळगव्हाणकर यांनी दाद मागितली, परंतु जिल्हा प्रशासनाने चक्क कानावर हात ठेवले.
न्यायालयात दाद मागणार
मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात माझ्याकडून ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम: हिंगोली जिल्ह्याचे योगदान’ हे पुस्तक प्रकाशित करून घेण्यात आले. केवळ प्रशासनाच्या असल्याचे संजय टाकळगव्हाणकर बेपर्वाईमुळे मला या पुस्तकाच्या छपाईचा खर्च अद्याप मिळालेला नाही. ही फसवणूक असून या प्रकरणी मी न्यायालयात दाद मागणार यांनी सांगितले.






























































