
मीरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा म्हणजे दिवसेंदिवस शोभेचे बाहुले बनत चालली आहे. परिवहन विभागाचे चाक सध्या ‘रुतले’ असून रस्त्यातच रोज बसेस बंद पडत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना तर पदरमोड करून खासगी रिक्षाने जावे लागते. बससाठी करावी लागणारी तासन्तास रखडपट्टी, खासगी बसेसचा सुळसुळाट व परिवहन विभागाचा बेशिस्त कारभार याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेत सध्या ७४ डिझेल आणि ५७ इलेक्ट्रिक अशा एकूण १३१ बसेस आहेत. मात्र डिझेल बसेसच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या कमी झाली आहे. विशेषतः रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून बसला उशीर झाल्याने पुढील ट्रेन चुकण्याची भीती प्रवाशांना सतावत असते. दरम्यान भंगार बसेसमुळे गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लवकरात लवकर तांत्रिक बाबी दूर करून परिवहनचा गाडा सुरळीत करावा, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयासमोरच परिवहन बसचे चाक निखळून टायर बाजूला पडल्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांवर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी बसेसच्या तांत्रिक स्थितीचा सखोल आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू
मे. महालक्ष्मी सिटी बस ऑपरेटर एलएलपीमार्फत परिवहनचा गाडा हाकला जातो. पण प्रत्यक्षात योग्य दुरुस्ती न केल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच सर्व अडथळे दूर करण्यात येतील, असे आश्वासन परिवहनचे विभागप्रमुख दिनेश कानगुडे यांनी दिले.



























































