
<< गौरी मांजरेकर
[email protected]
वैदिक सूक्तांमधील एका गूढ, अमूर्त संकल्पनेपासून सुरू झालेला ‘श्री गणेशा’चा प्रवास पुढे मध्ययुगीन पुराणांमधून आकारास आला आणि महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत कोट्यवधींच्या हृदयातील ‘लोकदैवत’ बनून रुजला. कोणत्याही कार्याचा प्रारंभ ज्याच्या नामस्मरणाने होतो, त्या विघ्नहर्त्याचा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा एक अनोखा इतिहासपट आहे.
वैदिक काळ (इ.स.पूर्व 1500-800) ः अमूर्त ‘गणांचा स्वामी’ ऋग्वेदात (2.23.1) गणपती ही हत्तीच्या मुखाची मूर्ती नसून एक अमूर्त संकल्पना होती. ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे…’ या प्रसिद्ध मंत्रात ‘गणांचा पती’ किंवा ‘प्रार्थनांचा स्वामी’ म्हणून ब्रह्मणस्पती (बृहस्पती) देवतेला ही पदवी दिली गेली होती. या काळात कोणत्याही भौतिक रूपाची किंवा मूर्तीची पूजा केली जात नव्हती, तर केवळ मंत्र आणि ऋचांद्वारे या अमूर्त शक्तीचे आवाहन केले जात असे.
उत्तर-वैदिक काळात अमूर्त संकल्पनेला प्रथमच एक निसर्गरूप मिळण्यास सुरुवात झाली. यजुर्वेदाच्या ‘मैत्रायणी संहिते’त (2.9.1) प्रथमच गणेशाच्या शारीरिक स्वरूपाचा संदर्भ मिळतो ः ‘तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्’. येथे ’वक्रतुंड’ आणि ‘दंती’ (हत्तीचे मुख असलेला) या शब्दांद्वारे गणपतीचे प्रतीक स्पष्ट झाले.वैदिक काळातील सूक्ष्म आणि अमूर्त ‘ब्रह्मणस्पती’ हळूहळू निसर्गातील भव्य, ताकदवान आणि बुद्धिमान अशा हत्तीच्या रूपाशी जोडला गेला. या काळात हत्तीचे मस्तक हे केवळ शारीरिक रूप नसून अफाट शक्ती, गांभीर्य आणि मार्ग निर्माण करणाऱया क्षमतेचे प्रतीक मानले गेले, ज्यातून पुढे ‘विघ्नहर्ता’ ही संकल्पना दृढ झाली.
उपनिषद काळ (इ.स.पूर्व 500-300) ः ‘गणपति अथर्वशीर्ष उपनिषदात’ गणपतीला केवळ एक देव न मानता सर्वोच्च परब्रह्म आणि सृष्टीचे मूळ मानले गेले ः ‘त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि… त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि’ येथे गणपतीला ॐकार (प्रणव) रूप आणि त्रिमूर्तींचा (ब्रह्मा, विष्णू, महेश) उगम मानले गेले.
गुप्त काळ व पुराणे (इ.स. 4 थे ते 10 वे शतक) ः गुप्त काळात गणपतीच्या स्वतंत्र मूर्ती व पूजेला ऐतिहासिक बळकटी मिळाली. उदयगिरी लेणी (विदिषा, मध्य प्रदेश), भूमराचे शिवमंदिर (सतना) आणि देवगडचे दशावतार मंदिर (उत्तर प्रदेश) येथे इ.स. 4 थ्या ते 6 व्या शतकातील गणपतीच्या सर्वात प्राचीन स्वतंत्र मूर्ती आढळतात. या काळात गणपती ’विघ्नहर्ता’ आणि आद्य पूज्य म्हणून प्रस्थापित झाला. तसेच महाभारतात महर्षी व्यासांचा लेखनिक म्हणून त्याचा गौरव झाला.
गणेश पुराण व गाणपत्य संप्रदाय (इ.स. 1100-1600) ः मध्ययुगात ‘गाणपत्य संप्रदाया’चा उदय झाला. या काळात रचल्या गेलेल्या ‘गणेश पुराणा’त (उपासना व क्रीडा खंड) गणपतीला सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ स्थान देऊन चार युगांतील त्याच्या अवतारांची (महोत्कट, मयूरेश्वर, गजानन, धूम्रकेतू) कथा मांडली गेली.
महाराष्ट्रातील भक्ती चळवळ (16 वे व 17 वे शतक) ः संत मोरया गोसावी यांनी चिंचवड येथे इ.स. 1561 मध्ये संजीवन समाधी घेतली. त्यांनी चिंचवड देवस्थानची स्थापना करून गाणपत्य संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या अनन्य भक्तीमुळेच ‘गणपती बाप्पा मोरया !’ या जयघोषाचा जन्म झाला.
समर्थ रामदास स्वामी यांनी ‘दासबोधाच्या’ प्रारंभी (1.1.2) गणेश स्तवन रचले आणि मोरगावच्या मयुरेश्वर दर्शनानंतर ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही प्रसिद्ध आरती रचून गणपतीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचे केंद्रस्थान बनवले.
आधुनिक काळात,1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी घरगुती पूजेला ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’चे क्रांतिकारी स्वरूप दिले. यामुळे गणपती हा केवळ धार्मिक राहिला नाही, तर तो समाज संघटन आणि राष्ट्रजागृतीचे महाप्रतीक बनला.


























































