
लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सुखावलेल्या जनतेसाठी सरकार ‘सुखहर्ता’ आणि ‘दुःखकर्ता’ ठरले आहे. ऐन गणेशोत्सवात महागाई वाढीची ‘विघ्न वार्ता’ आली आहे. घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारांत अन्नधान्यांचे आणि भाज्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे आणि बटाटय़ांच्या किमतीही उसळल्या आहेत. कांदा किलोमागे 65 रुपयांवर तर बटाटा 25 ते 30 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
केंद्र सरकारने महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार किरकोळ महागाई 4.8 टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा उच्चांक आहे. जुलैमध्ये 5.5 टक्के असलेली अन्नधान्याची महागाई ऑगस्टमध्ये 6 टक्क्यांवर गेली आहे. त्याचे परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. घाऊक बाजारात कांद्याच्या किमती किलोमागे 45 रुपयांवर गेल्या आहेत. तर बटाटा 12 ते 15 रुपयाने विकला जात आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू 10 ते 12 रुपयांना तर ऑनलाइन 15 रुपयांना मिळत आहे. याशिवाय खाद्यतेल व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
महागाईला अल् निनो जबाबदार
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी महागाईवर प्रतिक्रिया देताना सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ‘अल् निनो आणि इतर काही कारणांमुळे महागाई वाढली आहे. सरकार या मुद्दय़ावर संवेदनशील असून महागाई नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जोशी म्हणाले. ‘महागाईचे राजकारण करून काहीही होणार नाही. काँग्रेसच्या काळात महागाई 10 टक्क्यांपर्यंत गेली होती, असा दावाही त्यांनी केला.





























































