कंत्राटी चालकाचा निष्काळजीपणा; बेस्ट कर्मचाऱ्यासह दोघे जखमी, गोरेगावमध्ये बेस्टची बस मेट्रोच्या खांबाला धडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील कंत्राटी बसगाडय़ांच्या अपघाताचे सत्र सुरूच राहिले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी भागात बेस्टची कंत्राटी बस खासगी कारला घासून मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, अपघातात बसमधील दोघांना गंभीर दुखापत झाली. यात एका बेस्ट कर्मचाऱयाचा समावेश आहे. अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलवर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला. बेस्ट उपक्रमातील मातेश्वरी कंत्राटदाराची बस दिंडोशी आगारातून भाईंदर स्थानक पूर्वेकडे (बस मार्ग क्र. 705) जात होती. ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ उड्डाणपुलाखाली बस उजवीकडे वळण घेत होती. यावेळी चालकाने निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केली. वळण घेताना सुरुवातीला बसची मागील डाव्या बाजूने खासगी कारला धडक बसली. त्यानंतर बस मेट्रो मार्गिकेच्या खांबावर जोराने आदळली.

या अपघातात बसमधील दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये बेस्ट कर्मचारी राजेंद्र सोनवणे यांचा समावेश आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर 57 वर्षीय प्रवासी मंगेश मोडलेकर हेदेखील जखमी झाले. त्यांच्या हनुवटीला आणि डोक्याला दुखापत झाली. दोन्ही जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर अधिक उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात आली.

बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बस चालवणाऱया चालक संदीप पाटीलविरुद्ध कारचालकाने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेवरून अपघातग्रस्त बस ‘बेस्ट’च्या टोइंग वाहनाद्वारे ओढून वनराई पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आली.