नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी तिघांचा मृत्यू; अपघातांचे सत्र सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्ते कामातील महापालिकेची बेपर्वाई नाशिककरांच्या जीवावर उठली आहे. शुक्रवारपासून शहरात खड्डे व चिखलामुळे अपघात होवून तिघांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या तेवीसवर पोहोचली असून, अपघातांचे सत्र थांबतच नसल्याने महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

वडनेरदुमाला येथील कृष्णा ज्ञानेश्वर बेरड (23) हा तरुण मित्रासोबत सोमवारी पहाटे अडीच वाजता दुचाकीवरून पाथर्डी फाटा येथून आडगावकडे मंडळाचा गणपती आणण्यासाठी जात होता. स्वामी नारायण मंदिराजवळ दुचाकी घसरून कृष्णा गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याआधी रविवारी संध्याकाळी दिंडोरी रस्त्यावर बजाज शोरूमजवळ पवननगरच्या संतोष शिवाजी गांगुर्डे (30) याची दुचाकी घसरली, एसटी बसच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अश्वमेधनगरचा अमोल रामदास राबडे (29) याला शुक्रवारी संध्याकाळी आरोग्य विज्ञान विद्यापीठ रस्त्यावर नाथकृपा लॉन्ससमोर खड्डे, चिखलामुळे दुचाकी घसरून जीव गमवावा लागला.

महापालिकेने शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवले आहेत, अनेक महिने उलटूनही काम संथगतीने सुरू असल्याने नाशिककरांना रोजचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. सातत्याने अपघात होत असून, आतापर्यंत तेवीस जणांचा बळी गेला आहे.