
बाॅलिवूडमधील मैत्री आणि वैर यांच्या चर्चा अनेकदा आपल्या कानावर पडत असतात. नुकतेच एक निखळ मैत्रीचे नाते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आले आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि दबंग सलमान खान यांच्या मैत्रीतील भावबंध शेअर करत निखिल यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मंगळवारी रात्री निखिल अडवाणीने सलमान खानसोबतच्या मैत्रीतील एक भावनिक आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. कठीण काळात सलमानने दिलेल्या आधाराची आठवण काढत निखिल यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. निखिल अडवाणी यांनी सलमान खानसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यासोबत त्यांनी लिहिले, मला सलमानची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने मला फोन केला होता आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला.
यावर अधिक बोलताना निखिल अडवाणी म्हणाले, सलमानने केलेल्या मदतीमुळे मी सदैव ऋणी राहीन. निखिल अडवाणी आणि सलमान खान यांची ही भेट ‘द रिव्होल्युशनरीज’च्या विशेष स्क्रीनिंगनंतर झाली. सलमानने निखिल अडवाणी आणि अभिनेता-निर्माता भुवन बाम यांना आपल्या ‘गॅलेक्सी’ निवासस्थानी चित्रपटाचे स्क्रीनिंग पाहण्यासाठी आमंत्रित केले होते.
भुवन बामनेही या स्क्रीनिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सलमानच्या घरी त्यांच्यासोबत शो पाहिल्याचा आनंद व्यक्त करत त्याने निखिल अडवाणींचेही आभार मानले. निखिल यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये सलमान त्यांच्या मानेभोवती हात ठेवून उभा असल्याचे दिसते.
सलमान खान आणि निखिल अडवाणी यांचे व्यावसायिक नाते जवळपास दोन दशकांपासून आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सलाम-ए-इश्क’ या मल्टीस्टारर चित्रपटाचे निखिल यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमानसोबत प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, जुही चावला, अक्षय खन्ना, जॉन अब्राहम, विद्या बालन आणि गोविंदा यांसारखे कलाकार होते. यानंतर २०१५ मध्ये ‘हिरो’ चित्रपटासाठी दोघांनी पुन्हा एकत्र काम केले. निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटाचे सलमान खान सह-निर्माते होते. या चित्रपटातून सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.




























































