
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपला वर्षभरापेक्षा थोडाच अधिक काळ शिल्लक असताना हिंदुस्थानी संघाच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन–डे मालिकेसाठी बुधवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माचे भवितव्य आणि हार्दिक पंडय़ाचे पुनरागमन हे दोन प्रमुख मुद्दे असतील.
रोहितने 2027चा विश्वचषक खेळण्याची इच्छा स्पष्ट केली आहे. मात्र, त्याच्या भवितव्याबाबत बीसीसीआय आणि निवड समितीकडून परस्परविरोधी संकेत मिळाले आहेत. इंग्लंड दौऱ्यात निवडकर्ते रोहितच्या पुढे जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा झाली होती. मात्र, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित वन-डे योजनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेत 26 धावांनंतर त्याच्यावर टीका झाली; पण लॉर्डस्वरील अखेरच्या वन-डे डावात त्याने शतक ठोकून टीकाकारांना आपल्या बॅटमधून प्रत्युत्तर दिले.
ऑक्टोबर 2025मध्ये रोहितकडून वन-डे कर्णधारपद काढून शुभमन गिलकडे सोपवण्यात आले. त्याआधी रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे विश्वचषकाच्या संघात रोहितला स्थान मिळणार की नाही, याचे उत्तर निवड बैठकीत मिळण्याची शक्यता आहे.
हार्दिकशिवाय पर्याय कोणता?
आयपीएल 2026नंतर हार्दिकने एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. दुखापतींमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला माघार घ्यावी लागली. पुढील आठवडय़ात त्याची फिटनेस चाचणी होणार आहे. तो तंदुरुस्त ठरला तरी निवडकर्ते त्याला घाईने मैदानात उतरवण्याची शक्यता कमी आहे. 6 ऑक्टोबरपासून पुद्दुचेरीत होणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेतून त्याचे पुनरागमन होऊ शकते. हार्दिकच्या अनुपस्थितीत नितीश रेड्डी, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर आशियाई क्रीडा स्पर्धेत असल्याने रवींद्र जाडेजाकडे पुन्हा वळण्याची शक्यता आहे. कृणाल पंडय़ाही पर्याय ठरू शकतो.
ऋषभ पंत की ध्रुव जुरेल?
के. एल. राहुल पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक असताना राखीव जागेसाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्यात चुरस आहे. पंतने दोन वर्षांहून अधिक काळ वन-डे खेळलेले नाही, तर जुरेलने अद्याप वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणच केलेले नाही. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील 115 धावांच्या नाबाद खेळीमुळे जुरेलचा दावा मजबूत झाला आहे. यॉर्कशायरकडून दहा बळी घेणारा कुलदीप यादव वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याच्या शर्यतीत आहे. वरुण चक्रवर्ती उपलब्ध नसल्यास विप्रज निगमचाही विचार होऊ शकतो. इंग्लंडमधील दमदार कामगिरीनंतर युझवेंद्र चहलच्या पुनरागमनाची शक्यताही नाकारता येत नाही.



























































