
मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रॅकचे आधुनिकीकरण आणि वाढीव सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मध्य रेल्वेकडून पुणे यार्डमधील 52 किलो डायमंड लेआउटचे 60 किलोमध्ये यशस्वी रूपांतर करण्यात आले आहे. हे मोठे काम पूर्ण करण्यासाठी 8 तास 30 मिनिटांचा मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक सकाळी 8.15 ते सायंकाळी 5 या वेळेत एकूण 8 तास 45 मिनिटांसाठी नियोजित होता; मात्र तो वेळेच्या 15 मिनिटे आधीच म्हणजेच 4.45 वाजता पूर्ण करण्यात आला.
मध्य रेल्वेकडून ब्लॉकच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. यामध्ये 150 ‘पी-वे’ कामगार, 50 ‘एस अँड टी’ कर्मचारी, 4 ‘पी-वे’ व 4 ‘एस अँड टी’ पर्यवेक्षक, तसेच 1 ‘ग्लूड जॉइंट’ पथक आणि 4 लोहार (ब्लॅकस्मिथ) यांचा समावेश होता. अभियांत्रिकी आणि ‘एस अँड टी’ विभागाच्या समन्वयामुळे नियोजित कामे वेळेत पूर्ण झाली. ब्लॉकदरम्यान अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये 4 स्टॉक रेल्स आणि 4 टंग रेल्स (फिटिंग्जसह), 2 अॅक्यूट क्रॉसिंग्ज, 2 ऑब्टयूज क्रॉसिंग्ज, 12 अप्रोच रेल्स आणि 2 लीड रेल्स बदलण्याचा समावेश होता. याव्यतिरिक्त, 6 ‘इन-सिटू’ ग्लूड जॉइंट्स तयार करण्यात आले, 4 ‘प्री-फॅब्रिकेटेड’ ग्लूड जॉइंट्स बसवण्यात आले तसेच रॉडिंगसह 2 स्विच मोटर्स बदलण्यात आल्या. या डायमंड लेआउटचे 60 किलोमध्ये रूपांतर झाल्यामुळे रेल्वे ट्रॅकची पायाभूत रचना अधिक मजबूत होईल, सुरक्षिततेत वाढ होईल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.





























































