
‘शिंदेंच्या गटाचीच शिवसेना आहे, हे सांगण्यासाठी त्यांच्या वकिलांना निवडणूक आयोगाची बाजू कशी बरोबर आहे, हे सांगावे लागत आहे. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले वकील वेगळे आहेत, तरी शिंदेंच्या वकिलांना निवडणूक आयोगाच्या कृतीचे समर्थन करून स्वतःची बाजू बरोबर आहे, असे सांगण्याची वेळ आली आहे. कारण त्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच प्रतिवाद नाही. अशा सुमार पद्धतीने तोंडातून वाफ दवडली जातेय आणि कोर्टाचा वेळ वाया घालवला जातोय,’ अशा शब्दांत कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी शिंदे गटाच्या युक्तिवादावर ताशेरे ओढले आहेत.
आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव, चिन्ह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी पार पडली. शिंदे गटाच्या वतीने अॅड. नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेली मान्यता पूर्णपणे कायदेशीर व लोकशाही तत्त्वांना धरून असल्याचा दावा केला. त्यावर सोशल मीडियावर ट्वीट करत अॅड. सरोदे यांनी ताशेरे ओढले.
‘शिंदे गटाचीच शिवसेना आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या वकिलांना निवडणूक आयोगाची बाजू कशी बरोबर आहे, हे सांगावे लागत आहे. त्यांची युक्ती चांगली आहे, पण त्याला युक्तिवाद म्हणता येणार नाही. घटनाक्रम, वस्तुस्थिती, कायदा, दहावे परिशिष्ट, सिम्बॉल नियम, संविधान अशा सहा गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. सामना कायदेशीरतेचे सहा खांब विरुद्ध असंवैधानिकतेचे दोन खांब असा आहे,’ असे अॅड. सरोदे यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.





























































