सामना अग्रलेख – हवामानाचे ‘हवाबाण’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल, हा अंदाज अखेर फोलच ठरला. विदर्भातील काही जिल्हे, मुंबई व उत्तर कोकणचा भाग वगळता राज्याच्या अन्य भागांस या कमी दाबाच्या पट्ट्याने कोरडेच ठेवले. सरकारप्रमाणेच निसर्गाचा कमी दाबाचा पट्टाही गुजरातकडेच सरकला आणि निम्म्याहून अधिक महाराष्ट्र कोरडाच राहिला. हवामानाचे ‘हवाबाण’ खोटे ठरत असताना सप्टेंबरच्या अखेरीस पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल व महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल, असा नवा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हा अंदाज तरी ‘हवाबाण’ ठरू नये!

महाराष्ट्राला दुष्काळाच्या खाईत लोटायचेच असे यंदा निसर्गाने ठरवलेले दिसते. गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असताना ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खाते व अभ्यासकांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरवून वरुणराजाने पुन्हा एकदा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला हुलकावणी दिली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ११ तारखेपासून गणरायाच्या आगमनापर्यंत चांगला पाऊस पडेल, असे भाकीत वर्तवण्यात आल्यामुळे राज्यभरातील शेतकरी व सामान्य जनता आभाळाकडे टक लावून बसली होती. कमी दाबाच्या या पट्ट्याने संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेतले असते आणि राज्यात सर्वदूर पाऊस पडला असता तर शेतामध्ये करपू लागलेल्या पिकांना थोडेफार तरी जीवदान मिळाले असते. तथापि, कमी दाबाचा पट्टा गुजरातकडे सरकला आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या निम्म्याहून अधिक महाराष्ट्राचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, कोकण किनारपट्टीचे काही जिल्हे आणि मुंबई एवढ्याच भागात पावसाच्या सरी दोन दिवस कोसळल्या. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांतच फक्त हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातीलही काही जिल्हे वंचितच राहिले. नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या, परंतु त्यामुळे पिकांना

जीवदान मिळण्यासारखी

परिस्थिती नाही. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना या सर्वच जिल्हयांत ऐन पावसाळ्यातच भीषण छाया पसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्हयाचा बहुतांश भाग आणि सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत देखील दुष्काळस्थिती गंभीर आहे. सोलापूर जिल्ह्यात तर तब्बल दोन महिन्यांपासून पावसाचा थेंब पडलेला नाही. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत असताना सोलापूर जिल्हयात मात्र तब्बल ३५ अंश तापमानाइतकी नोंद झाली. दुष्काळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्हयातील अनेक तालुक्यांत यंदाच्या पावसाळी हंगामात खरिपाची पेरणीदेखील होऊ शकलेली नाही. मराठवाड्यासह अन्य जिल्हयांमध्ये पेरणी झाली, परंतु नंतर दीड महिना पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस, मका व हळद ही पिके करपून गेली. हवामान विभागाने कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १२ व १३ सप्टेंबर रोजी धाराशिवसह आसपासच्या जिल्हयांत विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला होता. हे दोन दिवस वातावरण तेवढे ढगाळ झाले; पण पावसाचा थेंबही पडला नाही. अल् निनो इफेक्टमुळे यंदा पर्जन्यमान कमी राहणार असा अंदाज हवामान खात्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच व्यक्त केला होता. देशभरातील साडेतीनशे जिल्ह्यांना अल् निनोचा फटका बसला आहे आणि

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे

कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहेत. मराठवाड्यात आजमितीस केवळ ५७.५८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत १०६ टक्क्यांहून अधिक नोंद झाली होती. पावसाळा संपत आला असताना मराठवाड्याच्या ७८० लघुप्रकल्पांत जेमतेम २० टक्के, तर ७६ मध्यम प्रकल्पांत अवघा २१ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा हिवाळ्यापर्यंतही टिकणारा नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचीही गंभीर टंचाई निर्माण होईल, असे भयावह चित्र आतापासूनच दिसते आहे. सोलापूर, अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल, हा अंदाज अखेर फोलच ठरला. विदर्भातील काही जिल्हे, मुंबई व उत्तर कोकणचा भाग वगळता राज्याच्या अन्य भागांस या कमी दाबाच्या पट्ट्याने कोरडेच ठेवले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पिकांना जीवदान मिळेल, विहीर-तलावांना पाणी येईल, खरिपाची पिके करपली तरी रब्बीची पिके तरी घेता येतील या शेतकऱ्यांच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी फिरले. सरकारप्रमाणेच निसर्गाचा कमी दाबाचा पट्टाही गुजरातकडेच सरकला आणि निम्म्याहून अधिक महाराष्ट्र कोरडाच राहिला. हवामानाचे ‘हवाबाण’ खोटे ठरत असताना सप्टेंबरच्या अखेरीस पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल व महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल, असा नवा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हा अंदाज तरी ‘हवाबाण’ ठरू नये !