
भटका कुत्रा चावल्यास सगळ्यात मोठी भिती असते ती रेबीज आजाराची. रेबीज हा आजार संक्रमित जनावराच्या लाळेद्वारे, विशेषतः चावल्यामुळे पसरतो. जर लाळ डोळे, नाक किंवा तोंडावाटे आत गेली, तरीही हा विषाणू कोणालाही संसर्गित करू शकतो. सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर रेबीज हा आजार जवळपास नेहमीच जीवघेणा ठरतो, परंतु लसीकरण, प्रभावी देखरेख आणि चावल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास तो टाळता येऊ शकतो. असे असले तरी रेबीजची भिती आजही कायम आहे. दक्षिण अमेरिकेतील एक देश मात्र रेबीज मुक्त झाला आहे. तशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली आहे.
डब्ल्यूएचओ सोमवारी सांगितले की, सार्वजनिक आरोग्याबाबत पाच दशकांहून अधिक काळ चालवलेल्या ‘प्रतिबंध आणि देखरेखीच्या’ जोरावर, मानवामध्ये कुत्र्यांमार्फत पसरणाऱ्या रेबीजचे निर्मूलन करणारा चिली हा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे. डब्लूएचओने सांगितले की, या देशात कुत्र्याकडून माणसात रेबीज पसरल्याची शेवटची नोंद १९७२ मध्ये झाली होती.
डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी एका निवेदनात म्हटले आहे, ‘याद्वारे नागरिकांचे रेबीजपासून संरक्षण करण्याच्या दशकांपासूनच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब दर्शवते आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये सातत्याने केलेल्या गुंतवणुकीचा प्रभाव दिसून येतो. हा आजार प्रतिबंध करण्यायोग्य असून या आजारापासून पूर्ण मुक्ती मिळू शकते हे अधोरेखित करणारे चिलीचे यश आहे. अशा प्रकारे रोगापासून मुक्ती मिळवता येते ही इतर देशांसाठी प्रेरणा आहे. ‘
डब्लूएचओने सांगितले की, या आजाराचा मुकाबला करण्यासाठी चिलीने यापूर्वीच प्रतिबंध आणि देखरेखीवर केंद्रित असलेले सार्वजनिक आरोग्य धोरण दीर्घकाळ कायम ठेवले आहे. या उपायांमध्ये पाळीव प्राण्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम आणि ज्या लोकांना विषाणूची लागण झाली असण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींसाठी लसींचा समावेश करण्यात आला होता. डब्लूएचओने पुढे म्हटले आहे की, ‘या घरोघरी जाऊन कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम, कुत्र्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठीचे विशिष्ट उपाय आणि जनजागृती व शिक्षणाचे उपक्रम यांची जोड देण्यात आली होती’.
हा टप्पा गाठल्यानंतर चिली मध्ये आनंद साजरा आला. चिलीच्या आरोग्यमंत्री मे चोमाली यांनी या यशाचे श्रेय ‘सामूहिक प्रयत्नांना’ दिले.



























































