
पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत मिरवणूक निघाली. मिरवणुकीत इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण आणि बुधवार चौकात सात थर रचून करण्यात आलेले बाप्पाचे जंगी स्वागत हे विशेष आकर्षण ठरले. या आगमन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.
तुज मागतो मी आता, मज द्यावे एकदंता तुझे ठायी माझी भक्ती, विरुढावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती…
लाडक्या गणपती बाप्पांचे ‘मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात गणेश चतुर्थीला सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. मध्यान्हाचा मुहूर्त साधत ‘श्रीं’ची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणात सारेच बाप्पाच्या सेवेत रंगून गेलेत. सलग १२ दिवस गणरायांची आराधना करायला मिळणार, याचा आनंद भक्तांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. शहर आणि परिसरात पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘श्रीं’ची स्वागत मिरवणूक निघाली. सनईचे मंगलमय सूर, टाळ्यांचा कडकडाट, रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, पावसाच्या हलक्या सरींची बरसात आणि मुखामुखांतून होणारा ‘मंगलमूर्ती’चा जयघोष… असा भारावलेल्या वातावरणात गणपती बाप्पाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करून बाप्पाला त्याच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुर्वा, शमीपत्र, केवड्याचे पान, जास्वंदाचे फूल असे सारेकाही त्याच्या आवडीचे अर्पण करून बाप्पा सुंदर मखरात विराजमान झाले. घरोघरी आणि सार्वजनिक गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांची पहाटेपासूनच लगबग सुरू होती.

बाप्पाच्या स्वागत मिरवणुकीत शिस्तबद्ध आणि दमदार वादनाने चैतन्य आणले. प्रमुख पथकांच्या वादनावर तरुणाई आणि बालगोपाळांनी ठेका धरला. विशेष म्हणजे, पथकांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा विशेष सहभाग दिसला.
संध्याकाळनंतर मिरवणुकांनी अधिक रंगत झाली. आकर्षक विद्युतरोषणाई (लायटिंग) आणि जिवंत देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिक पहिल्याच दिवशी गर्दी करताना दिसले. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले.

डीजेला विरोध आणि कर्णकर्कश आवाजाने त्रासलेले नागरिक या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव निर्विघ्न पार पडेल, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली. आता सलग १२ दिवस गणरायाच्या भक्तीत रंगून त्याची सेवा करण्याचा आनंद गणेशभक्त घेणार आहेत.



























































