
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा उडवत महिला ‘आशिया करंडक ‘वर तब्बल आठव्यांदा नाव कोरले. मात्र, जेतेपदानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यातही हिंदुस्थानचा पाकिस्तानला सणसणीत संदेश कायम राहिला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास हिंदुस्थानी खेळाडूंनी स्पष्ट नकार दिला. यावेळी प्रेक्षकांनी नक्वींना ‘चोर… चोर…’ अशा घोषणा देत डिवचले.
मोहसीन नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्रीही आहेत. हिंदुस्थानविरोधी भूमिकेमुळे यापूर्वी २०२५च्या ‘आशिया करंडक’मध्येही हिंदुस्थानी पुरुष संघानेही त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली नव्हती. आता महिला संघानेही तोच पवित्रा कायम ठेवला.
ट्रॉफी नको, विजयाचा जल्लोष पुरेसा!
ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी हातात पाण्याची बाटली उंचावत विजयोत्सव साजरा केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही बाटली ट्रॉफीप्रमाणे उंचावत संघाच्या विजयाचा आनंद लुटला. मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी स्पष्ट केले की, ट्रॉफी न घेण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’चा असून, संघ या निर्णयासोबत आहे. बीसीसीआयने पर्यायी व्यवस्था सुचवली होती. मात्र, नक्वींना ती मान्य नसल्याचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले.
स्मृती-शेफालीचा विक्रमी तडाखा
हिंदुस्थानच्या विजयात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी निर्णायक भूमिका बजावली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी करीत महिला टी-२० ‘आशिया करंडक’मधील सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रम रचला. शेफालीने अवघ्या २४ चेंडूंत अर्धशतक झळकावीत स्पर्धेतील सर्वांत वेगवान अर्धशतकाची नोंद केली. हिंदुस्थानने संपूर्ण स्पर्धेत तब्बल ३२ षटकार ठोकत आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडविले. शेफालीने यंदा टी-२० क्रिकेटमध्ये ६७५ घावा केल्या असून, एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.
श्रीचरणीचा फिरकीचा कहर
गोलंदाजीत हिंदुस्थानश्री श्रीचरणीने २० घावांत चार बळी घेत श्रीलंकेची फलंदाजी मोडून काढली. यंदाच्या वर्षात तिच्या टी-२० बळींची संख्या ३९ झाली असून, ती एका वें लेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० बळी घेणारी हिंदुस्थानी गोलंदाज ठरली आहे. तिने पूनम यादवचा ३५ बळींचा विक्रम मागे टाकला.

























































