ब्रेक फेल झाल्याने बेकाबू ट्रेलर गणेश आगमन मिरवणुकीत घुसला; दोन ठार, सात जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंप्रीराजा येथे सोमवार, १४ रोजी रात्री आठ वाजता गणेश आगमन मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसल्याने भीषण अपघात झाला. ट्रेलरने मिरवणुकीतील गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात विठ्ठल रामभाऊ जाधव (३८, रा. पिंप्रीराजा), रमेश लहू बनसोडे यांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले. जखमींमध्ये गणेश सुरेश पवार (३२), त्यांचा सहा वर्षांचा मुलगा हर्षवर्धन गणेश पवार, वैभव सोमीनाथ भावले, नामदेव बनसोडे, विष्णू गणेश राजने, अमोल शिवलाल फतपुरे, प्रकाश चंद्रभान पाखरे यांचा समावेश आहे.

एमएच-२१-बीएच-७४१६ क्रमांकाचा ट्रेलर दहेगाव-करमाड राज्य मार्गाने करमाडच्या दिशेने येत होता. पिंप्री राजा गावाजवळील वळण रस्त्यावर येताच ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याचवेळी गावातून गणेशमूर्ती स्थापनेसाठी मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत नागरिकांसह गणेशमूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुढे जात असताना बेकाबू झालेला ट्रेलर पाठीमागून आला आणि त्याने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, मिरवणुकीतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या अपघातामुळे नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी धावाधाव केली. काही क्षणांतच घटनास्थळी आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, जमादार जयसिंग नागलोत यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गणेश आगमनाच्या उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीत अचानक हा अपघात झाल्याने पिंप्रीराजा गावावर शोककळा पसरली. विठ्ठल जाधव, रमेश बनसोड यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ट्रेलरचे ब्रेक नेमके कोणत्या कारणामुळेनिकामी झाले, तसेच अपघाताच्या वेळी ट्रेलरचा वेग किती होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.