दिवाळीत ‘राम’ भिडणार गॉडझिलाशी! सोशल मीडियावर मीम्सना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुचर्चित रामायण हा चित्रपट येत्या दिवाळीत येत असल्याने या चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिवाळी म्हटल्यावर फटाके, फराळ आणि सुट्टी असे समीकरण असताना , सिनेरसिकांसाठी सुद्धा मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. बाॅलिवूडमध्ये ‘रामायण’ आणि जपानचा लोकप्रिय माॅन्स्टर चित्रपट ‘गाॅडझिला मायनस झीरो’ हे चित्रपट ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे बाॅक्स आॅफिसवर होणारी ही टक्कर सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरलेली आहे.

रामायण आणि गाॅडझिला एकाच वेळी प्रदर्शित होत असल्याने आता सोशल मीडियावर चर्चेला आणि मीम्सना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या लढतीला हिंदुस्थानी चाहत्यांनी आपल्या स्टाईलमध्ये नावही देऊन टाकलं आहे. सोशल मीडियावर ‘गॉड व्हर्सेस गॉडझिला’या नावाने चर्चा रंगली आहे. एकीकडे रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम, तर दुसरीकडे थेट गॉडझिला! त्यामुळे पडद्यावर नेमकी कोणाची दहशत जास्त दिसणार, याची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये आहे.

‘रामायण’च्या प्रदर्शनाची चर्चा आधीपासूनच जोरात सुरू आहे. त्यातच चित्रपटातील ‘जय जय राम’हे पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला. गाण्याच्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची यापूर्वी न पाहिलेली दृश्ये पाहायला मिळाली. त्यासोबतच चित्रपटातील व्हीएफएक्स आणि कलर ग्रेडिंगमध्येही सुधारणा करण्यात आल्याचे दिसून आले. ‘गॉडझिला मायनस झिरो’ हा चित्रपट ६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार आहे. तर ‘रामायण’ ८ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे परदेशातील बाजारपेठांमध्ये दोन्ही चित्रपटांमध्ये थेट स्पर्धा पाहायला मिळू शकते.

हे दोन चित्रपट एकत्र रिलीज होणार असल्याने, चाहत्यांनीही आपली कल्पनाशक्ती पणाला लावली आहे. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी रणबीर कपूरच्या प्रभू श्रीरामच्या रूपाला गॉडझिलासोबत जोडणारे पोस्टर्स तयार केले आहेत. तर काहींनी यशच्या रावणाच्या रूपाला गॉडझिलासमोर उभे केले आहे. एकीकडे प्रभू श्रीरामांचा भव्य अवतार आणि दुसरीकडे गॉडझिलाचा राक्षसी अवतार आता मीम्सच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे रामायण विरुद्ध गॉडझिला ही बॉक्स ऑफिसची लढत सध्या चाहत्यांसाठीच चर्चेचा विषय ठरली आहे. आता दिवाळीत प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.