
दहीहंडीच्या दिवशी रिलिफ हॉस्पिटलमध्ये घुसून तेथील डॉक्टरला शिवीगाळ व कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह २२ जणांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत असून सर्वोच्च न्यायालयानेदेखील गंभीर दखल घेतली आहे.
आठ दिवसांपासून शिंदे गटाचे निलंबित असलेले पाच पदाधिकारी, एक नगरसेवक आणि एक कार्यकर्ता फरार झाला होता. हे सर्व पदाधिकारी रविवारी पोलिसांच्या शरण आले. पालघरच्या सुट्टीकालीन न्यायालयामध्ये त्यांना सकाळी ११ वाजता हजर करण्यात येणार होते. मात्र त्यानंतर चार वाजता आणि अखेर या सर्वांना रात्री पावणेआठच्या दरम्यान न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणावरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी योगेश गजभिये यांनी नाराजीदेखील दर्शवली. आरोपींचे वकील, सरकारी वकील यांनी तब्बल दोन ते तीन तास युक्तिवाद केला. अखेर रात्री साडेअकराच्या दरम्यान न्यायाधीश गजभिये यांनी या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हॉस्पिटलच्या मारहाण प्रकरणातील शिंदे गटाचा निलंबित पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे याच्यासह साईराज पाटील, मनीष (विकी) संखे, राहुल संखे, ऋषभवारे यांसह नगरसेवक नीलम संखे, मनोज घरत, शुभम बांदिवडेकर, साहिल राऊत या आठजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संखे याच्या वाहनचालकालाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात १७ ऐवजी २२ जणांवर कारवाई सुरू आहे.





























































