
पहलगाम हल्ल्याचा सूड घेण्यासाठी हिंदुस्थानने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये लष्कराने एस-४०० हवाई प्रणालीचा वापर करून तब्बल ३१४ किमी अंतरावरून पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मिरातील पहलगाम येथे अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून जवळपास ३० पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेचा सूड घेण्यासाठी भारताने ७मे ते १० मे या कालावधीत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते.
हिंदुस्थानी लष्कराने क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून पाकिस्तानातील अनेक अतिरेकी अड्डे नेस्तनाबूत केले होते.
पाकिस्ताननेही हिंदुस्थानच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्याची तयारी केली. त्यासाठी एफ-१६ हे अत्याधुनिक लढाऊ विमान सज्ज करण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने एस-४०० या हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर केला. ३१४ किमी अंतरावरून हिंदुस्थानी क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाचा वेध घेतला. त्यात पाकिस्तानचे एफ-१६ पडले होते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने आपल्या ताज्या अहवालात दिली आहे.


























































