
श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी दि. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान मूर्तींवर ‘प्रोटेक्टीव्ह कोटींग’ (संरक्षक आवरण) देण्याचे काम करण्यात येणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी ही माहिती दिली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडणार आहे. यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्ये असे संवर्धन करण्यात आले होते.
मूर्ती संवर्धनाच्या या कामासंदर्भात उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि मंजुरीनुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. यापूर्वी जून महिन्यात हे काम प्रस्तावित होते, परंतु न्यायालयीन स्थगिती आणि त्यानंतर आलेल्या आषाढी यात्रेमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. अखेर न्यायालयाने मंदिर समितीच्या भूमिकेला मान्यता दिल्यानंतर, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २५ सप्टेंबरपर्यंत हे तांत्रिक काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या महत्त्वाच्या संवर्धन प्रक्रियेदरम्यान मूर्तीची सुरक्षितता आणि धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी दि. २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी (मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन) पूर्णवेळ बंद राहणार आहे. २२ सप्टेंबर रोजी रात्री दर्शन बंद झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, तर २६ सप्टेंबरपासून दर्शन पुन्हा पूर्ववत सुरू होईल. या काळात वारकरी आणि भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
























































