
मुंबईतील आपल्या घरात झालेल्या हल्ल्याला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या घटनेचा आपल्या आयुष्यावर झालेला परिणाम अभिनेता सैफ अली खानने आता सांगितला आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितले की, त्याचे कुटुंब या धक्कादायक घटनेतून तुलनेने लवकर सावरले असले, तरी तो मात्र अजूनही या घटनेच्या परिणामातून पूर्णपणे बाहेर आलेला नाही. काही गोष्टी पाहिल्यानंतर त्याला त्या रात्रीची आठवण होते.
सैफने हल्ल्याच्या आठवणींबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. कुटुंबाने या प्रसंगाचा सामना चांगल्या प्रकारे केला असल्याचे त्याने सांगितले. मात्र, या घटनेचा सर्वाधिक परिणाम पत्नीवर झाल्याचेही त्याने नमूद केले. “आम्ही या घटनेचा खूप चांगल्या प्रकारे सामना केला. माझ्या मते, माझी पत्नी या घटनेने सर्वाधिक प्रभावित झाली. ती स्वभावाने खूप संवेदनशील आहे. आम्ही या घटनेतून तुलनेने लवकर सावरलो. मात्र, तो प्रसंग खूपच भयंकर होता. मी अजूनही त्यातून पूर्णपणे सावरलेलो नाही. चाकू दिसला की आजही मला भीती वाटते,” असे सैफने सांगितले.
‘मी किती नशीबवान होतो, याचा विचार येतो’
हल्ल्याच्या वेळी झालेल्या जखमांबद्दल बोलताना सैफने आपण त्या प्रसंगातून वाचलो, हे आपले मोठे भाग्य असल्याचे सांगितले. हल्ल्यादरम्यान चाकू तुटल्यामुळे जखमा आणखी गंभीर होण्यापासून आपण वाचलो असावे, असे त्याला वाटते.
“तो चाकू खूपच खराब होता. त्याच्याकडे आणखीन चांगला चाकू असता, तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो. चाकूने वार केला की तो कुठेही जाऊ शकतो. माझ्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या, पण त्या जीवघेण्या ठरल्या नाहीत. मी किती नशीबवान होतो, याचा अजूनही विचार येतो,” असे सैफने म्हटले.
मृत्यूची भीती नव्हती, पण पॅरालिसिसची भीती होती
या हल्ल्यामुळे सैफला आपल्या मृत्यूचाही विचार करावा लागला. मात्र, त्या कठीण प्रसंगी त्याला मृत्यूची फारशी भीती वाटली नाही. उलट, रक्ताने माखलेल्या अवस्थेतही तो काहीसा शांत होता आणि आपल्या आयुष्याचा विचार करत होता.
सैफच्या मते, त्या वेळी त्याला सर्वाधिक भीती मृत्यूची नव्हती, तर हल्ल्यातून वाचल्यानंतर पॅरालिसिस होण्याची होती. म्हणजेच शरीराचा एखादा भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता त्याला अधिक घाबरवत होती.

























































