
खुनाच्या प्रकरणात गेल्या चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. खटला सुरू होऊनही आतापर्यंत केवळ एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली असून नजीकच्या भविष्यात खटला पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे, तसेच आरोपीला खटल्यावर जलद सुनावणीचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने आरोपीची सुटका केली.
अर्जदार अक्षय साठे याच्यावर खुनाच्या गुह्याखाली वालचंदनगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी 25 ऑगस्ट 2022 पासून कोठडीत आहेत. जामीन मिळावा यासाठी आरोपीने अॅड. विवेक आरोटे यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.


























































