
सणासुदीच्या दिवसांत दूध, पनीर, खवा या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ उघड होत असतानाच आता पूजेच्या साहित्यातही बनावट वस्तूंची विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. शिर्डी येथे हरतालिका पूजेसाठी साहित्य खरेदी करत असताना एका दुकानात चक्क प्लॅस्टिकचे बदाम आढळून आल्याने खळबळ उडाली. शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच शहरातील इतर पूजासाहित्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणीही सुरू केली आहे.
हे प्लॅस्टिकचे बदाम नेमके कुठून आले? हे बदाम किती ठिकाणी विकले गेले? याचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
हरतालिकेच्या पूजेसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेचाच एक कर्मचारी दुकानात गेला होता. त्यावेळी काही बदाम संशयास्पद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. बारकाईने पाहणी केली असता हे बदाम प्लॅस्टिकचे असल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभाग तसेच सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाची पाहणी करून बनावट पूजासाहित्य विक्री करणाऱ्या त्या दुकानदारावर कारवाई केली.
प्लॅस्टिकचे बदाम संबंधित दुकानदाराने स्वतः तयार केले होते की बाहेरील कोणत्या पुरवठादाराकडून खरेदी केले होते, याचा तपास सुरू आहे. नगरपरिषद प्रशासनाने पूजासाहित्य विक्री करणाऱ्या इतर दुकानांची तपासणी केली.

























































