
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार! गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज (14 सप्टेंबर 2026) वाजत गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आज गणेश चतुर्थीला १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती गणपती आणि १२६ सार्वजनिक गणपती अशा एकूण १,६९,६६४ गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
आज सकाळी गणपती बाप्पांचे वाजत-गाजत आगमन झाले. कर्ला-आंबेशेतची पारंपरिक मिरवणूक आज ढोलताशांचा गजरात दिमाखात निघाली. या मिरवणूकीचे हे ४१ वे वर्ष होते. मिरवणुकीत ढोलताशे, लेझीम, झांज पथक आणि बॅण्डचा समावेश होता. मिरवणूकीच्या वेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज वाजत-गाजत बाप्पांचे आगमन झाल्यानंतर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मनोभावे पुजाअर्चा आणि आरती करण्यात आली. कोकणातील घरातून भजनाचे सूर घूमू लागले आहेत.
गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण आहे. घरोघरी मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणपतीसाठी खास आरास करण्यात येते. काही ठिकाणी देखावे उभारले जातात. चाकरमानी मोठ्या संख्येने घरच्या गणपतीबाप्पासाठी कोकणात दाखल झाले आहेत.
























































