
बँक खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाचे सिम कार्ड बंद पाडायचे. मग त्याची माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन बँक खात्यांवर डल्ला मारायचा. अशाप्रकारे सुमारे 80 सिम कार्ड बंद पाडून आर्थिक फसवणूक करण्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या एका एअर टेल कंपनीच्या एजंटसह त्याच्या साथीदारांना दक्षिण सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
दक्षिण मुंबईत राहणारे ऋषभ कुमार यांच्या कंपनीचे दोन मोबाईल क्रमांक एस बँकेच्या खात्याशी संलग्न होते. या दोन मोबाईल क्रमांकाचे सिम कार्ड बंद पाडून नेटच्या सहाय्याने त्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला होता. आरोपींनी बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवून 20 लाख 84 हजार इतके ऋषभ यांच्या खात्यातील पैसे वळते करून घेतले होते. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर दक्षिण सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, ऋषभ यांना ओटीपी व ट्रान्झॅक्शनचे ऍलर्ट मिळू नये याकरिता त्यांचे दोन्ही सिमकार्ड बंद पाडून त्यानंतर संबंधित माहिती आरोपींना देण्यात आली. मग आरोपींनी त्या माहितीच्या आधारे बँक खात्यातील 20 लाख 84 हजार काढून घेतले. हा कारभार एअर टेल कंपनीच एजंट म्हणून काम करणारा बिंदेश्वरी शहा व त्याचा साथीदार करत असल्याचे समजताच दक्षिण सायबर पोलिसांनी बिंदेश्वरी शहा व त्याचा साथीदार विनोद चौधरी यांना अहमदाबाद येथून आणले. या दोघांनी आतापर्यंत अशाप्रकारे 80 सिम कार्ड बंद पाडून त्याची माहिती साथीदारांना देत आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.





























































