
मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासासंदर्भात जब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘मराठवाडयाचा विकास, तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन करण्यात आले. १७ सप्टेंबर, मुक्तिसंग्रामदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाचा समारोप होणार असून सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्तालयासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ते सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्रामातील हुत्तात्म्यांना अभिवादन करणार आहेत.
शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबरपासून मराठवाड्यात ठिकठिकाणी ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने मराठवाड्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या विकास योजना, त्यासाठी मिळालेला निधी आणि प्रत्यक्ष झालेले काम याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात आला. या आंदोलनाचा समारोप १७ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तालयासमोर होणाऱ्या आंदोलनाने होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यात सहभागी होणार आहेत.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, लक्ष्मणराव बडले, बबनराव भोरात, राज्य संघटक चेतन कांबळे, आमदार राहुल पाटील, कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्तंभ येथे हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत.
मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा, रखडलेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून, मराठवाड्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, रणजीत पाटील, बालाजी रेड्डी, जोतिबा खराटे, भुजंग पाटील, बबन बारसे, संदेश देशमुख, गोपू पाटील, रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, महानगरप्रमुख विवेक नावंदर, प्रकाश मारावार यांनी केले आहे.



























































