
गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी तमाम भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या ऐश्वर्यात घसघशीत भर पडली आहे. बाप्पाच्या दानपात्रात (स्टेज पेटी) तब्बल 27 लाख 50 हजार रुपयांचे दान अर्पण करण्यात आले आहे. रंगपेटीमध्ये 21 लाख रुपयांचे दान अर्पण करण्यात आले आहे. यामध्ये रोकड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. मागील वर्षी 46 लाख रुपयांचे दान पहिल्या दिवशी अर्पण करण्यात आले होते.
केवळ मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आणि संपूर्ण हिंदुस्थानातून भाविक मोठय़ा आस्थेने ‘लालबागचा राजा’च्या चरणी लीन होतात. गणेशोत्सव काळात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक रांगेत तासन्तास उभे राहतात. बाप्पाच्या दानपात्रात कोणी मनापासून भरभरून दान अर्पण करते. कुणी गेल्यावर्षी बोललेल्या नवसाची पूर्ती झाल्याने बाप्पाचे आभार मानण्यासाठी एखादा मौल्यवान दागिना दान करत असते. कुणी नवस बोलून मनातील इच्छा व्यक्त करते.
पहिल्याच दिवशी हिरा अर्पण
आश्चर्याची बाब म्हणजे, पहिल्याच दिवशी हिरा लालबागचा चरणी अर्पण करण्यात आला आहे. जमलेली रोकड आणि मौल्यवान दागिने आणि वस्तूंची मोजणी लालबागचा राजा मंडळाकडून केली जात आहे. जास्वंदाचे फुल, मोदक, गणपतीच्या मूर्ती, अनेक सोने-चांदीच्या वस्तूदेखील लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी भाविकांकडून अर्पण करण्यात आल्या आहेत.




























































