एफडीएकडे औषधांच्या तक्रारींमध्ये 557 टक्के वाढ; राज्यभरात कारवाईचा धडाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपहारगृहांतील अस्वच्छतेच्या प्रश्नाबरोबरच आता औषधांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांत औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) गेल्या वर्षी याच कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या तुलनेत यंदाच्या तक्रारींचे प्रमाण तब्बल 557 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्या तक्रारींच्या आधारे एफडीएने राज्यभर धडक कारवाई केली आहे.

गेल्या वर्षी जून ते ऑगस्टदरम्यान औषधांसंदर्भात एकूण 850 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यंदा याच तीन महिन्यांत तक्रारींची संख्या तब्बल 1 हजार 317 वर पोहोचली आहे. तक्रारींसोबत त्यांच्या चौकशीच्या संख्येतही 378 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2025-26 मध्ये आलेल्या तक्रारींपैकी 773 तक्रारींची चौकशी करण्यात आली होती. तर तीन महिन्यांच्या कमी कालावधीतच 924 तक्रारींची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत एफडीएने कारवाईचा धडाका लावला आहे. बेकायदेशीर व निकृष्ट दर्जाच्या औषध विक्रीप्रकरणी 20 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून सुमारे 11.41 कोटी रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या ऍक्शन मोडमुळे ही मोठी कारवाई झाल्याचे स्पष्ट होत आहे.