एसटी बसस्थानकांकर 125 हिरकणी कक्ष, महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाने ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर’सोबत सामंजस्य करार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. स्तनदा मातांना प्रकासादरम्यान आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर ही कंपनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. सामंजस्य करारानुसार राज्यातील एसटी बसस्थानकांकर अंदाजे 3 मीटर×3 मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत.

तीन वर्षांत कक्ष उभारण्याचे नियोजन

सामंजस्य करारामधील नियोजनानुसार पुढील तीन आर्थिक वर्षांत एकूण 125 ‘हिरकणी कक्षउभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 50 कक्ष, 2027-28 मध्ये 50 कक्ष आणि 2028-29 मध्ये 25 कक्षांची उभारणी करण्यात येणार आहे.