शिवसेनेच्या मागणीला यश; एसटीच्या एनसीएमसी कार्ड सक्तीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांसाठी लागू केलेल्या एनसीएमसी कार्ड सक्तीच्या निर्णयाला अखेर 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने एनसीएमसी कार्ड सक्तीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. संघटनेच्या पत्राची दखल घेत महामंडळाने कार्ड सक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ दिल्यामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांना 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी अनिवार्य केले होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. एसटीच्या वाहकांनाही प्रशिक्षणाअभावी त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले होते. प्रणालीतील तांत्रिक अडचणी, वाहकांना अपुरे प्रशिक्षण आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेत एनसीएमसी कार्ड योजनेच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती. संघटनेच्या पत्राची गंभीर दखल घेत एनसीएमसी कार्ड सक्तीच्या निर्णयाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आणि 30 सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीनेच सवलतीचे तिकीट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ज्यांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांनी कार्डद्वारे सवलतीचा लाभ घ्यावा, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

चालक-वाहकांना सूचना देण्याचे आदेश

सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि आगार व्यवस्थापकांना चालक-वाहकांना तातडीने सूचना देण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतीच्या तिकिटापासून वंचित ठेवू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे. शिवसेनेच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून सणासुदीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.