
तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गद्दारांना भाजपने झटका दिला आहे. पक्षातून फुटून बाहेर पडलेले खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सध्या इतर पक्षांतील कोणताही नेता किंवा खासदाराला पक्षात घेण्याची आमची योजना नाही, असे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे या खासदारांची राजकीय कोंडी झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी भाजपमधील इनकमिंगबाबत चर्चा फेटाळताना सांगितले की, केवळ पक्षात सामील व्हायचे आहे, म्हणून कोणालाही प्रवेश देणार नाही. मात्र हे सर्व दिल्लीत घडले. त्यांना कोलकात्याला पोहोचायला वेळ लागेल, असे भट्टाचार्य म्हणाले होते.
बंडखोर खासदाराने केली होती घोषणा
तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांपैकी 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे तृणमूलचे बंडखोर खासदार जगदीशचंद्र बसुनिया यांनी जाहीर केले होते. मात्र बंडखोर गटातील अबू ताहेर खान यांनी हा दावा फेटाळला होता. त्यापाठोपाठ इतर काही खासदारांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले. याशिवाय भाजपनेही त्यांचा दावा खोडून काढल्यामुळे बसुनिया हे तोंडावर आपटले.

























































