
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिय इंटेलिजन्सरून सध्या जगभरात जोरदार वाद सुरू आहेत. एकीकडे OpenAI आणि Anthropic सारख्या कंपन्यांचे प्रमुख AI वर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे AI चा वेग मंदावला तर चीन शर्यतीत पुढे निघून जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. या सर्व गदारोळात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एका मुलाखतीदरम्यान जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे.
AI मुळे समाजात जे प्रचंड बदल होणार आहेत आणि त्यासाठी जगातील कोणतेही सरकार पूर्णपणे तयार नाही. सरकारांची तयारी या तंत्रज्ञानाच्या वेगाच्या मानाने खूप मागे पडली आहे. AI मुळे अनेक पारंपरिक नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल आणि लाखो नोकऱ्या धोक्यात येतील. AI चा वापर करून अधिक घातक सायबर हल्ले केले जाऊ शकतात. AI चॅटबॉट्स आणि डिजिटल सोबत्यांशी संवाद साधण्याचे प्रमाण वाढल्याने लोकांना त्याचे व्यसन लागण्याची भीती आहे, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला.
दरम्यान, AI च्या शर्यतीत अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये सर्वात मोठी स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देशांकडे जगातील सर्वोत्तम AI मॉडेल्स बनवण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन आणि चीनी AI मॉडेल्सच्या क्षमतेत फार मोठा फरक उरलेला नाही. AI चा वेग कमी करणे म्हणजे चीनला जिंकवून देणे आहे, असे विधान ट्रम्प यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे ही स्पर्धा आता केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता जागतिक राजकारण आणि सुरक्षेशी जोडली गेली आहे.
AI चा फायदा फक्त श्रीमंत देश किंवा मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित राहता कामा नये. यासाठी गेट्स फाउंडेशन’पुढील दोन वर्षांत 1 अब्ज डॉलर (सुमारे 8000 कोटी रुपये) खर्च करणार आहे, अशी माहितीही बिल गेट्स यांनी दिली. हा निधी गरीब आणि विकसनशील देशांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी वापरण्यात येईल. स्थानिक भाषांमध्ये AI मॉडेल्स तयार करण्यासाठीही याचा वापर होईल, जेणेकरून प्रादेशिक भाषांमधील लोकांना याचा फायदा घेता येईल. तसेच आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि रोगांचे वेळेत निदान करण्यासाठीही या निधीचा वापर केला जाईल.
चित्रपटांमध्ये जेव्हा पृथ्वीवर एलियनचे आक्रमण होते, तेव्हा अमेरिका, चीन आणि जगातील सर्व देश आपले जुने वैमनस्य विसरून एकत्र येतात आणि त्याचा सामना करतात. AI सुद्धा आपल्यासमोर एका एलियनप्रमाणेच आला आहे. त्यामुळे आता जगाला आपले मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे, असे मत गेट्स यांनी व्यक्त केले. सर्व देशांनी AI च्या नियमनासाठी एकत्र येऊन जागतिक नियम बनवले पाहिजेत, जेणेकरून या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखता येईल, असेही ते म्हणाले.
AI चा विकास अत्यंत वेगाने होत आहे, तर त्या तुलनेत सरकारी नियम आणि कायदे बनवण्याचा वेग अतिशय मंद आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धेमुळे कोणतीही कठोर बंधने घालण्यास देश तयार नाहीत, कारण यामुळे आपण शर्यतीत मागे पडू अशी भीती प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे AI ला नियंत्रणात आणणे हे येत्या काळात जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे, असेही बिल गेट्स म्हणाले.


























































