
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत 5.5 किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1.93 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी म्यानमारच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारची नागरिक असलेली एक महिला 11 सप्टेंबर रोजी बँकॉकहून दिल्लीत आली होती. टर्मिनल 3 वर ही महिला पोहचली असता प्रोफाइलिंगच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तिला अडवले. तपासणीसाठी तिला ग्रीन चॅनेलकडे वळवण्यात आले. त्यानंतर तिच्या ट्रॉली बॅगमधून गांजाची पाच पॉलिथिन पाकिटे सापडली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जप्त केलेल्या गांजाचे वजन 5.5 किलो असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1.93 कोटी रुपये आहे. म्यानमारची नागरिक असलेल्या या महिलेला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
























































