
गेल्या ५० दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे निलंगा तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निलंगा तालुका भाजपच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. संतप्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वाळलेल्या सोयाबीनच्या पेंड्या थेट तहसीलदारांच्या दालनात फेकत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला आणि तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
निलंगा तालुक्यात सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली होती. पिके बऱ्यापैकी बहरली देखील होती; मात्र गेल्या ५० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके वाळून गेली आहेत. सोयाबीनच्या पिकांना शेंगाच लागलेल्या नाहीत. पिकांच्या नुकसानीसोबतच आता तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. संकटकाळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चाऱ्याची छावणी सुरू करावी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या आंदोलनात भाजप जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, निलंगा विधानसभा निवडणूक प्रभारी दगडू सोळंके, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, नगराध्यक्ष संजय हलगरकर, औराद बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, पंचायत समिती सभापती सौ. सुनिता वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

























































